By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 07:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक आजार यांची तपासणी करण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंत रुग्ण शोध विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कालपासून या मोहिमेस प्रारंभ झाला. राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असून त्यात ग्रामीण भागातील सर्व व शहरी भागातील 30 टक्के जोखीमग्रस्त लोकसंख्येचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अभियानामुळे लवकर निदान लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
संयुक्तरित्या विशेष रुग्ण शोध अभियान राबविणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य
राज्यामध्ये एकाच वेळी संयुक्तरित्या तीन कार्यक्रमासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून 70 हजार 778 प्रशिक्षित पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. एक कोटी 73 लाख घरांचे, 14 हजार पर्यवेक्षकांच्या मार्फत हे सर्वेक्षण घेण्यात येईल. हा उपक्रम संयुक्तरित्या राबविण्यात येत असून कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण यांचा शोध घेऊन त्यांना उपचारा खाली आणणे व शासनाद्वारे उपलब्ध केलेल्या औषधोपचाराद्वारे त्वरित उपचार देणे तसेच समाजातील 30 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग या आजारांबाबत सर्वेक्षण करून जनजागृती व्हावी या उद्देशाने हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. रोगाचे लवकर निदान व्हावे तसेच त्वरित उपचार मिळून समाजात या आजारांचे प्रमाण कमी होण्यास ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संयुक्तरित्या असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री शिंदे यांनी दिली.
राज्यातील या अभियानाच्या समन्वयासाठी व यशस्वीतेसाठी राज्यस्तर समिती, जिल्हास्तर समिती , तालुकास्तर समिती व जनजागृती समिती अशा विविध स्तरांवर समित्या नेमण्यात आल्या असून सूक्ष्म नियोजन व अंमलबजावणीसाठी कार्यशाळाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवेतील व इतर विभागातील अधिकारी-कर्मचारीही यात सहभागी होत असून या अभियानाची जनजागृती करण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, मंडळ तसेच व्यवसायिक संस्था यांचाही ही सहभाग असणार आहे. या अभियानातील सर्वेक्षणांमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, महिलांमधील स्तनांचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग या आजाराबाबत तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांची नोंदणी करून त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचण्यांद्वारे निश्चित रोगनिदान करून मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. निरोगी समाजाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असून सर्वांच्या सहभागाने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री श्री शिंदे यांनी केले आहे.
वनस्पती तेलाच्या सेवनाऐवजी गाईचे शुद्ध तूप सेवन केल्यामुळे कॅन्सरशी सामन....
अधिक वाचा