By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकदा दिल्लीमध्ये चोर्या खूप वाढल्या, म्हणून व्यापार्यांचे शिष्टमंडळ बादशहाला भेटायला गेले, आणि रात्रीच्या वेळी शिपायांची गस्त वाढवावी, अशी विनंती त्यांनी बादशहाला केली. त्यावर बादशहा म्हणाला,
''शिपायांनीच का म्हणून गस्त घालावी? उद्यापासून तुम्ही गस्त घाला आणि आमचे शिपाई तुमच्या दुकानात बसण्याचे काम करतील.''
बादशहाचा हा विचित्र हुकूम ऐकून व्यापार्यांनी गुपचूपपणे बिरबलाची भेट घेऊन त्याला बादशहाच्या विचित्र हुकुमाबद्दल सांगितले. या जबाबदारीतून सुटका होण्याची एक युक्ती बिरबलाने त्यांना सांगितली.
बिरबलाने सांगितल्याप्रमाणे व्यापार्यांनी डोक्याचे पागोटे पायात घातले आणि पायातले जोडे डोक्यावर घेतले आणि 'अंगावर पडलेच आहे, तर केलेच पाहिजे,' असे म्हणत रस्त्यारस्त्यावर गस्त घालणे सुरू केले.
''आपण सांगितले, तसे व्यापारी रात्री गस्त घालतात की नाही?'' हे पाहण्यासाठी बादशहा रस्त्याने फिरू लागला, तर त्याला तेथे अजबच दृश्य दिसला.
त्याने काही व्यापार्यांना याबद्दल विचारले,
''काय हो, हे पायांतले जोडे डोक्यावर घेण्याचा आणि डोक्यावरील पगडी पायात घालण्याचा काही उपयोग आहे?''
यावर ते व्यापारी उत्तरले, '' खाविंद, ज्यांना स्वत:चे रक्षणही स्वत: करता येत नाही, त्यांच्यावर शहर-रक्षणाची जबाबदारी टाकण्याचा उपयोग काय? आणि ज्यांना व्यापार कसा करावा, याची अंधुकशीही जाणीव नाही, त्यांना दुकानात बसवून उपयोग काय? तरीही पडलंच आहे अंगावर, तर गस्त घातलीच पाहिजे, म्हणून आम्ही कसं तरी ती पार पाडीत आहोत.''
व्यापार्यांचे हे उत्तर ऐकून बादशहाला आपली चूक समजली व त्याने ती त्वरित दुरुस्तही केली.