By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 08:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आई एकसारखी रडतच होती. बाबा अजून ड्युटीवरून परत आले नव्हते.'सोनू बेटी, काय केलंस हे? मी भाजी आणायला बाजारात गेले होते आणि एका क्षणात कसं घडलं सगळं? आपल्या धाकट्या भावाला मोनूला वाचवण्याच्या नादात पोरी, तू स्वत:कडे लक्षच दिलं नाहीस. आम्ही तुला फुलासारखं वाढवलं. तुझी काळजी घेतली. तू तर आमच्या अंगणातली तुळस होतीस.. परमेश्वरा, तू आम्हाला कन्यादानाचं पुण्यही लाभू दिलं नाहीस.. काय केलंस तू असं? आणि का..?'
'आई, मोनू झोपला होता. अचानक खोलीत कशी आग लागली, कुणास ठाऊक? मोनूची किंचाळी ऐकून मी जेव्हा पळत तिकडे गेले, तेव्हा आग सगळ्या खोलीत पसरली होती. मी झटकन आत जाऊन मोनूला बाहेर ढकललं, पण ज्वाळांनी तोपर्यंत मला घेरलं. मी बाहेर येऊ शकले नाही. माझा आरडाओरडा, किंचाळणं ऐकून शेजारी धावून आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. आई, तू नेहमीच म्हणतेच ना, मोनू आमची म्हातारपणाची काठी आहे. आमचा आधार आहे. मी तर एक मुलगी आहे, परक्याचे धन. एक ना एक दिवस मला तुमचा निरोप घ्यायचाच होता, पण आई, मोनूला काही झालं असतं, तर आपली म्हातारपणाची काठी, आपला आधार कोण झालं असतं?'बोलता बोलता ती शांत झाली आणि ते निस्तब्ध वातावरण आईच्या किंकाळीने चिरत गेलं.