By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सोन्याच्या तुलनेत आर्टिफिशियल ज्वेलरी कमी भावात मिळते. हल्ली सोन्याचा भाव इतका वाढलाय की तुमच्याजवळ सोने असले तरी ते बँक लॉकरमध्येच ठेवावे लागते. तसेच इतके जड दागिने घालून रोज वावरणे हे फक्त सीरियलमधील स्त्री पात्रांनाच शोभते आणि जमू शकते. सर्वसामान्य गृहिणींना, नोकरदार महिलांना हे सगळं घालून वावरणं अवघड जातं. शिवाय प्रवासात असे दागिने घालणे हे जिकिरीचे आहे. त्यामुळेच रोजच्या जीवनात आर्टिफिशियल ज्वेलरी हा महत्त्वाचा पर्याय ठरतो.
आर्टिफिशियल ज्वेलरीचा दुसरा एक फायदा असा की, यात दागिने अगदी आकर्षक असतात. विविध प्रकारचे दागिने घालायला मिळतात. उदा. बांगड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन्स मिळतात.
मंगळसूत्रामध्येसुद्धा गळ्याबरोबरचे लांब मंगळसूत्र चेनमधील किंवा फक्त काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असे विविध प्रकार घालता येतात. इयररिंग्जही वेगळ्या डिझाईनमध्ये आणि आकर्षक आकारात,रंगात मिळतात. त्यामुळे मॅचिंगचा प्रश्नही मिटतो आणि रोज तेच तेच दागिने घालून कंटाळाही येत नाही. तसेच हे दागिने हरवले तर फारसे दु:खही होत नाही. त्यामुळे हे दागिने खूपच फायदेशीर ठरतात.
हल्लीच्या काळात महिलांची जीवनशैली बदलली आहे. नोकरी करणार्या महिलांना तर कामानिमित्त कुठे कुठे बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत सोन्याचे दागिने घातले तर काम बाजूला राहून ते सांभाळण्याचीच कसरत होऊन जाते. अशा वेळी या दागिन्यांचा मोठा आधार वाटतो. तसेच त्यांमुळे व्यक्तिमत्त्वही प्रभावी दिसते. दुसरी एक गोष्ट म्हणजे, मॅचिंगचे दागिने घालण्याची हल्ली क्रेझ आहे. सोन्याचांदीच्या आणि हिर्यांच्या दागिन्यांमध्ये फारशी विविधता नसते. परंतु आर्टिफिशियल ज्युलरीमध्ये ही विविधता आनंददायी ठरते. यामुळे तुमच्या वस्त्रप्रावरणाला मॅच होईल असे दागिने तुम्हाला निवडता येतात.