By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 04:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हरिसाल गाव तीन वर्षापूर्वी डिजिटल करण्यात आले आहे. आता तेथे काही सुविधा नसतील किंवा तांत्रिक प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मनसेच्या सभेत सर्वप्रथम देशातील पहिले डिजिटल गाव हरिसालबाबतची सत्य वस्तुस्थिती मांडली होती. त्यानंतर भाजपने राज ठाकरे यांचे आरोप खोडून काढले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज यांचे आरोप फेटाळताना आता हरिसालला जाऊन पाहा असे सुनावले होते. दरम्यान, हरिसाल गावाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने गावाला भेट देऊन तेथील सद्यस्थिती दाखविली होती. त्याचाही रिपोर्ट राज ठाकरे यांनी सोमवारच्या सोलापूरातील सभेत लोकांना दाखवला होता. राज ठाकरे व वाहिन्याच्या रिपोर्टनंतर हरिसाल गावची स्थिती जगासमोर आली. तसेच भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच पोलखोल झाली.
हरिसाल डिजिटल गावाचे प्रश्न सोडविणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तावडे म्हणाले की, हरिसाल गाव हे तीन वर्षापूर्वी डिजिटल करण्यात आले होते. आता तेथे काही सुविधा नसल्याचे समोर येत आहे. तसेच तेथे जे काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत तेही लवकरात लवकर सोडवले जातील.
हरिसाल गावाची जाहिरात करणारा व त्या गावातील तरूण मनोहर खडके याच्याशी संपर्क साधला जाईल व त्याला कोणत्या अडचणी आल्या हे विचारले जाईल असेही तावडेंनी यावेळी सांगितले. मनोहर खडके या तरूणाला राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत जाहीर मंचावर आणले होते. खडके हा तरूण गावातील डिजिटल काम बंद करून पुणे-मुंबईत नोकरी शोधतोय असे राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत सांगितले होते.
मागील 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा, घरांचा प्रश्न अजून....
अधिक वाचा