By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2024 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा देखील राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा येत्या 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा मोठा जंगी कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांचा भलामोठा गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबतच्या चर्चा कितपत खऱ्या आहेत ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत भूमिका मांडली. ते विधान भवन परिसरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाहीबद्दल वैयक्तिगत भावना नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही”, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
राजीनामा का दिला?
“प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, असं काही नाही. मी अनेक वर्षांपासून, जन्मापासून ते आतापर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. मला वाटतं की, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे”, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. “मी कोणत्याही आमदाराला संपर्क साधलेला नाही”, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
‘मी कोणत्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही’
“मी पक्षातील अंतर्गत कोणत्या गोष्टींना चव्हाट्यावर मांडणार नाही. मी तसा व्यक्ती नाही. मी कालपर्यंत प्रदेश कार्यालयाच्या बैठकीत हजर होतो. पण आजपासून मी पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. माझा तो उद्देश नाही”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, नारायण ....
अधिक वाचा