By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 10:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात दु:ख व्यक्त केलं जात आहे. सुषमा स्वराज यांनी त्यांचा स्वभाव आणि वागण्यामुळे भारतीय राजकारणात एक आदर्श महिला नेतृत्व तयार केलं होतं. आणीबाणीच्या काळानंतर त्यांचे नेतृत्व उभारु लागलं. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाच्या विस्तारामध्ये त्यांचे मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या जाण्याने देशाचं, पक्षाचं आणि माझं वैयक्तिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे मला नेहमी मार्गदर्शन करत होत्या. माझी तब्येत खराब झाली होती तेव्हा त्या डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आल्या होत्या. एक मोठी बहीण म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माया केली. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी देशाचा सन्मान जगभरात वाढविला. त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखविला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. स्वराज यांचे अचानक जाणे हे संघटना, देश आणि कौटुंबिक नुकसान आहे असं त्यांनी सांगितले.
त्यांनी शेवटी जे ट्विट केलं ते भावनिक आणि मनाला वेदना देणारं आहे. कलम 370 हटविण्याचा दिवस पाहण्यासाठी मी थांबली होती अशाप्रकारे त्यांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशाची जी हानी झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही या शब्दात नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला.
मंगळवारी रात्री उशीरा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे स्वराज यांनी अवघ्या तीन तासांपूर्वीचं राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं ट्विट केलं होतं. प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्वराज यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलं होतं.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मं....
अधिक वाचा