By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी भाजप शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह तब्बल 16 मंत्रिपदं देण्याची तयारी दर्शवली आहे.त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल. तसेच राज्यातील महत्त्वाची दोन मंत्रीपद शिवसेनेला देण्याची तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला 16 विविध मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली आहे.
मात्र भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्याशिवाय शिवसेनेला गृहमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री ही महत्त्तवाची खाती सोडण्यासही भाजपने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या बोलणीसाठी काल (29 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात याबाबतची बोलणी होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे. यामुळे ‘मातोश्री’ मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. या विधानामुळे शिवसेनेकडून ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
सत्तास्थापनेचं गणित
भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.
अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवलं आहे.
युरोपियन संघ (ईयू) चं संसदीय प्रतिनिधीमंडळाने २९ ऑक्टोबर रोजी काश्मीर दौरा ....
अधिक वाचा