By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2024 08:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मनोज जरांगे पाटील यांचा भव्य मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. हा मोर्चा उद्या मुंबईच्या वेशीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा जरांगेंना माघारी परतण्याची विनंती केली आहे. तर मुंबई हायकोर्टात जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पोलीस आणि सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. जरांगे यांच्या मोर्चाला मराठा आंदोलकांकडून प्रचंड मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. मनोज जरांगे यांचा हा मोर्चा उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, अशी विनंती आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या. त्याही सापडू लागल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू आहे. 1 लाखापेक्षा जास्त लोक या मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. मागास आयोग तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. त्रृटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेतला जाईल. टिकणारे आरक्षण दिलं जाईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील यांना कालही विनंती केली. सरकार सकारात्मक आहे. माझी मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना विनंती आहे, सरकार निगेटीव्ह असतं तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता. म्हणून आंदोलन टाळले पाहिजे. आतापर्यंत न झालेले काम सरकार करत आहे. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजेत. सर्व सामान्यांचे हे सरकार आहे. सरकार एकणारे आहे. सर्वांच्या सुट्या रद्द करून हे सरकार कामाला लागले आहे. पूर्ण टिम कामाला लागली आहे. तुम्ही सरकारला सुचना करू शकता”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई हायकोर्टात जरांगे यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी
दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने पोलिसांना मनोज जरांगे यांना हायकोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्याचे आदेश दिले. तसेच आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त जणांना येता येणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं. तसेच सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी, असं हायकोर्ट म्हणालं. या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली.
‘आमचा न्यायालयात विजय झाला’, सदावर्तेंची प्रतिक्रिया
“आमचा न्यायालयात आज विजय झाला असं आम्ही समजतो. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे काय-काय परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना आम्ही न्यायालयाला दिली. न्यायालयाला शाहीनबाग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलाय हे देखील सांगितले. सरकारमधील मंत्री दोन गटात विभागल्याने पोलीस कारवाई करु शकत नाही हे आम्ही न्यायालयासमोर मांडले. आझाद मैदानाची क्षमता ही ५ हजार लोकांची आहे तर शिवाजीपार्क हे आंदोलनासाठी वापरले जावू शकत नाही असे न्यायालयाचेच आदेश आहे. त्यामुळे मनोज जरांगे मुंबईत येवू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे आता सरकारला, पोलीस महासंचालकांना उच्च न्यायलयाचे आदेश मानावे लागतील. मनोज जरांगे यांनी मोर्चाची परवानगी मागितली नाही त्यामुळे त्यांचे आंदोलन हे असंविधानिक आहे. कोर्टाने त्यांना देखील नोटीस बजावली आहे”, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीनंतर दिली.
बर्दवानच्या गोदर मैदानात ममता बॅनर्जी यांची प्रशासकीय मिटिंग होती. मिटिंग ....
अधिक वाचा