By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 08:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली. हाच मुद्दा उचलत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे रुग्णांना मदतीसाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी वाऱ्यावर असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही हरकत घेतली.
धनंजय मुंडे म्हणाले, “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत दखल घेत रुग्णांना मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत ही विनंती”
याबाबत धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी रुग्णांचे होणारे हालही मांडले आहेत. तसेच राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्याचा कारभार राज्यपाल चालवत असल्याने त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु करुन या रुग्णांना मदत करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भात राज्यपालांना पत्र दिले आहे. राज्यपाल या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतील, अशीही अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
मदतीच्या अपेक्षेने आलेल्या रुग्णांचे हाल
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून काहीतरी मदत मिळेल या आशेने अनेक रुग्ण मंत्रालयात आले. मात्र मंत्रालयात आल्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच बंद असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यामुळे या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाट्याला निराशाच आली. त्यामुळे आता आर्थिक अडचणीच्या काळात मदत कुणाकडे मागायची? मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कधी सुरु होणार? अशा अनेक प्रश्नांनी संबंधितांना काळजीत टाकलं आहे.मागील साडेचार वर्षात 56 हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळाली आहे. वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी अनेक गरिब रूग्णांचा जवळपास साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
राज्याची अस्थिर राजकीय परिस्थिती असून आधी दुष्काळ आणि आता अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकारी परदेश दौऱ्यावर उधळपट्टी करत असल्याचा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंडे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे हा दौरा रद्द करण्याचीही मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आण....
अधिक वाचा