By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपुर - भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नागपुरात महाराष्ट्र विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नागपूर मुक्कामी आहेत. यावेळी एकनाथ खडसे त्यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. आज खडसे शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ खडसे नागपूरमध्ये पोहोचले आहेत. खडसेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. 45 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. एकनाथ खडसेंना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. 'खडसे भाजपवर नाराज आहेत; पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची, माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
तसेच विधानसभा निवडणुकीत आधी तिकीट न दिल्यामुळे खडसे नाराज होते. त्यानंतर मुलगी रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. रोहिणी यांचा अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांनी पक्षातील काही जणांनी यासाठी कामं केलं असा गंभीर आरोप केला होता.