By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2020 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकनाथ खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल होती. ही कार्यकर्त्यांची संख्या भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे.
जळगावातील मुक्ताईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाची ही पहिलीच पक्षबांधणीची बैठक होती.
जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात मुक्ताईनगर भुसावळ, रावेर, या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. मात्र या बैठकांमध्ये स्थानिक तुरळक कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही याठिकाणी पाठ फिरवली होती.
मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे, अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके,यांची या बैठकीला उपस्थिती होती.
खडसे गेल्याने भाजपाला फटका बसणार नाही : गिरीश महाजन
“एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे” असा दावा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.
राष्ट्रवादीने आमदारकी दिली तरी आनंदच : एकनाथ खडसे
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल केंद्री....
अधिक वाचा