By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 07:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
नवी दिल्ली - नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे सध्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. खडसे आज दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. ते उद्या मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती त्यांनीच दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिलीये त्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, जल आयोगाच्या काही प्रस्तावाबाबत मी शरद पवार यांची भेट घेतली. उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत दोषी लोकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींना केलीय. तर मुलीच्या पराभवा बाबत निवडणुकीत काय झाले याची विचारपूस शरद पवार यांनी केली अशी माहितीही त्यांनी दिली.
'मला जर कुठल्या पक्षात जायचे असेल तर अंधारात जाणार नाही. पत्रकार परिषद घेऊन जाईल. माझा पक्षात वारंवार अपमान होत आहे. त्यामुळे मी वेगळी भूमिका घेणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार की नाही जनतेला लवकरच कळेल,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय गुपीत ठेवल्याचे दिसुन येतेय. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. मागील चार वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतल्याचंही बोललं गेलं. मात्र नंतर खडसे यांनी आपली निष्ठा पक्षासोबत असल्याचं बोलून दाखवलं. आता मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कापलेलं तिकीट आणि नंतर मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव, यामुळे एकनाथ खडसे निर्णायक बंडाच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाबी आणि स्थानिक स्वराज्य संस्थे....
अधिक वाचा