By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
“मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र कुणी उमेदवारीच देत नाही” अशी खंत लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारीबाबत सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फक्त चर्चेपुरताच राहिली प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. लोकसभेत लोक कलावंतांचाही एक प्रतिनिधी असावा असे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले आहे.
सुरेखा पुणेकर एका कार्यक्रमानिमित्त गुरुवारी कल्याण येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “काही दिवसांपूर्वी दिल्लीतून सुरेखा पुणेकर यांना एका पत्रकाराचा फोन आला होता. त्यावेळी आपल्या उमेदवारीबाबत काँग्रेस पक्षात चर्चा सुरु असल्याचे त्यांना कळले होते. मला पुण्यातून उमेदवारी दिली जाईल असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची विचारणा झाली नाही” असे पुणेकर यांनी सांगितले.
काँग्रेसने माझा विचार केला नसल्याने इतर कोणत्याही पक्षाकडून मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या. तमाशा व इतर लोक कलावंतांच्या खूप व्यथा आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत त्यांच्यातीलच एखाद्या प्रतिनिधीची गरज आहे असं सुरेखा यांनी मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशात आणि विदेशातही मी तमाशा व लावणीचे कार्यक्रम केले असून त्यामुळे माझी ओळख सगळ्यांना आहे, निवडणुकांसाठी माझी वेगळ्याने ओळख कोणाला सांगावी लागणार नाही असा दावा सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत माझा विचार होणार नसेल तर निदान विधानसभा निवडणुकीत तरी माझ्या उमेदवारीबाबत विचार करावा अशी मागणी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ....
अधिक वाचा