By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिंमत असेल फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवावी, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिले आहे. काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या मुद्द्यावर अधुनमधून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतात.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी चित्रपट आणि करमणूक धोरणावरील वेबिनारमध्ये योगी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा, असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले. तर दुसरीकडे भविष्यात महाराष्ट्र सरकार फिल्मसिटीला आधुनिक सोयी पुरवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. बॉलीवूड इंडस्ट्रीला आज काही व्यथा, वेदना असतील तर त्या दूर करणं सरकार म्हणून आमचं काम आहे. सरकार बॉलीवूड इंडस्ट्रीला हव्या त्या सोयी पुरवायला तयार आहे. मात्र, यामधून चांगला समाज घडवला गेला पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात सगळं काही आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली, त्याठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला
यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तूनही योगी सरकारच्या फिल्मसिटी उभारण्याच्या घोषणेवर निशाणा साधण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे चित्रीकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु होईल. पुढच्या दोन-अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. मात्र, त्यानंतरही मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील, असे शिवसेनेने म्हटले होते.
बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही; उद्धव ठाकरे
बॉलिवूडला संपवण्याचा किंवा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ही कारस्थानं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिला होता. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, असे उद्धव यांनी म्हटले होते.
शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठ....
अधिक वाचा