By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 01:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर दमानिया यांनी अर्ज केला होता. तो अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केल्याने खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दर्शवली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
अंजली दमानियांची प्रतिक्रिया...
“दीडवर्षापूर्वी मी अर्ज केला होता. आता या प्रकरणाला गती येईल अशी अपेक्षा आहे. खडसे वारंवार म्हणत होते की माझ्याविरोधात पुरावे द्या, काहीच सिद्ध झालेलं नाही. मात्र कुठलीच कारवाई झालेली नव्हती, कारवाईच थांबली होती. त्यांना मे महिन्यात क्लीनचिट मिळाली होती. त्यानंतर मी तातडीने एसीबी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता माझी याचिका स्वीकारली आहे, त्यावर आता सुनावणी सुरु होईल”, असं अंजली दमानिया यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर, दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा दाखला देत त्याला आव्हान दिलं होतं. खडसे यांनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसात झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचं वकिलांनी न्यायालयात म्हटलं.
काय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण?
एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती र....
अधिक वाचा