By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून १ लाख ३० हजार मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी त्यांना वांद्रे पूर्व या एकमेव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यापेक्षा पिछाडीवर राहावे लागले. या मतदारसंघात कॉंग्रेसला मिळालेल्या मताधिक्यामुळे शिवसेनेची नाराजी भाजपला भोवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
वांद्रे पूर्व येथील स्थानिक शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांच्या मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांना मताधिक्य मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रिया दत्त यांना ६० हजार २६५ मते मिळाली आहेत तर महाजन यांना ५८ हजार ९८९ मतांवर समाधान मानावे लागले. महाजन यांना लोकसभा मतदारसंघात १ लाख ३० हजाराचे मताधिक्य असताना या मतदारसंघात त्यांना १२७६ मतांनी पिछाडीवर राहावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ए.आर.अंजारीया यांना या मतदारसंघात ५६४१ मते मिळवण्यात यश आले आहे.
या मतदारसंघात एकूण १ लाख २९ हजार ३१५ मतदान झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघात १ लाख २२ हजार ५५५ मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात प्रिया दत्त यांना ४९ हजार २७ मते मिळाली होती तर महाजन यांना ६२ हजार ५१२ मते मिळाली होती. २०१४ मध्ये महाजन यांना १३ हजार ४८५ मताधिक्य मिळाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांना मताधिक्य गमवून १२७६ मतांनी पिछाडीवर जावे लागल्याने भाजपच्या गोटातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेकडून पुरेसे सहकार्य मिळाले नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसच्या दत्त यांची २०१४ च्या तुलनेत ११ हजार २३८ मते वाढली आहेत. तर महाजन यांना २०१४ च्या तुलनेत ३५२३ मते गमवावी लागली आहेत. मोदी लाट असताना देखील या मतदारसंघात भाजप- शिवसेनेच्या मतांमध्ये घट होऊन कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीची मते वाढली असल्याच्या प्रकाराकडे भाजप व विद्यमान आमदार असलेल्या शिवसेनेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा विधानसभेला या मतदारसंघात कॉंग्रेस आघाडी व सेना भाजप युतीमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेना व भाजपला चांगले यश मिळत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख वास्तव्य करत असलेल्या मतदारसंघात कॉंग्रेसला मताधिक्य मिळाल्याने शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र पूनम महाजन यांच्या प्रचार दौऱ्यात लावले नसल्याचा मुद्दा समोर आल्यावर युवासेनेने प्रचारातून अंग काढून घेतले होते. महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेतल्यावर युवासेनेने प्रचारात सक्रिय होण्याची ग्वाही दिली होती. निकालामध्ये प्रत्यक्षात शिवसेनेची नाराजी भोवल्याचे दिसत आहे.
विधानसभेवर काय परिणाम ?
कॉंग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये अधिक चुरस निर्माण होऊ शकते.शिवसेना व भाजपच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांविषयी काहिसा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाचा समावेश असलेल्या मतदारसंघात विजयी होण्यासाठी कॉंग्रेसकडून जास्त प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडल्यानंतर शुक....
अधिक वाचा