जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा
By
SHEETAL CHAVAN | प्रकाशित:
ऑगस्ट 05, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौर्या वर जाऊन आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तेथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले, शिवाय अमरनाथ यात्रा स्थगित करून यात्रेकरूंना तात्काळ माघारी परतण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर तेथील इंटरनेट सेवा आणि फोन सेवा बंद करण्यात आली. त्याचवेळी जम्मू काश्मीरबाबत केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याचप्रमाणे आज सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकेच नाहीतर राज्याच्या पुनर्रचनेचा ही प्रस्ताव अमित शहा यांनी मांडला. त्यानुसार लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळा करण्याचा प्रस्ताव आहे. जम्मू काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. मात्र जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेचं अस्तित्व कायम राहणार आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ बाबत निर्णय घेण्याआधी तेथे काही भागांत १४४ कलम लागू करण्यात आले. सरकारच्या या निर्णयाने जम्मू काश्मीरचा स्वतंत्र स्वायत्त राज्याचा अधिकार संपुष्टात येणार आहे, तर लडाख हा यापुढे संपूर्ण केंद्रशासीत प्रदेश असेल. आतापर्यंत जम्मू काश्मीर राज्याची स्वतंत्र घटना होती, तसेच स्वतंत्र झेंडा होता. आता या निर्णयाने भारतीय घटनेतील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू होतील. जम्मू काश्मीरची वेगळी घटना व झेंडा संपुष्टात येईल. सर्वांना मालमत्ता खरेदी विक्रीचा अधिकार प्राप्त होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.