By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये मोदी त्सुनामीपुढे सर्वच विरोधी पक्ष भुईसपाट होताना दिसत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील हाच कल महाराष्ट्रातही दिसत आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव विजय झाले होते. मात्र, यंदा शिवसेना आणि भाजपच्या जोरदार मुसंडीमुळे काँग्रेसला या दोन जागाही गमवाव्या लागू शकतात.
अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे नांदेडची जागा गमावणे ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की ठरू शकते. तर हिंगोली मतदारसंघात यंदा राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार ते तब्बल २१ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण हेदेखील तब्बल १३ हजार मतांनी मागे पडले आहेत.
तर राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसची मोठ्याप्रमाणावर पिछेहाट झाली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ४४ जागा मिळाल्या होत्या. हा काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव मानला जात होता. यामुळे काँग्रेसला लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थितीही फारशी चांगली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार मावळ मतदारसंघात तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. त्यांच्या या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्की होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. आताच्या आकडेवारीनुसार शिवसेना २० आणि भाजप २३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या उत्तर मुंबईची लढत यंदा कधी नव्हे इतक....
अधिक वाचा