By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात महाआघाडीकडून युवा स्वाभीमानी पक्षाच्या नवनीत राणा निवडणूकीच्या रिंगणात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दीक वार सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकीत रंगत आणली आहे. तेलगू चित्रपट अभिनेत्री असणाऱ्या नवनीत कौर राणा खरंतर राजकारणात नवख्या आहेत. पण गेल्या पाच वर्षांत त्यांना राजकारणातले खाचखळगे समजले आहेत.२०१४ मध्ये नवनीत राणांनी मोदी लाटेतही घड्याळाच्या चिन्हावर लढताना ३ लाख २९ हजार २८० मतं घेत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांना चांगली झुंज दिली होती. आता त्या पुन्हा एकदा अडसुळांविरुद्ध रिंगणात उतरल्या आहेत. अमरावतीचा रखडलेला विकास, हा त्यांचा मुख्य निवडणूक मुद्दा आहे. अडसुळांना मात्र हॅट्ट्रीक साधण्याचा विश्वास आहे. नवनीत राणांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. राणांकडे प्रचारासाठी पैसा कुठून आलाय, असाही त्यांचा सवाल आहे. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांना पडणारी मतं निर्णायक ठरतील, अशी स्थिती आहे. मात्र यावेळी नवनीत कौर राणा युवा स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवत असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचारापासून अद्याप दूर असल्याचं चित्र आहे. याचा फटका राणांना बसू शकतो.गेल्या दोन दशकांपासून अमरावतीत शिवसेनेचा भगवा फडकतोय. मात्र पूर्वीइतकी शिवसेना इथं मजबूत राहिलेली नाही. त्यामुळे या रणांगणात शिवसेनेच्या वाघाला भाजपची किती साथ मिळते त्यावर अडसुळांचं भवितव्य अवलंबून आहे.
आज सकाळी रुग्णालयात जाऊन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसचे ....
अधिक वाचा