By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यामध्ये आजच नव्या महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. तर रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात मांडण्यात येणार आहे.
बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे आजच विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. याआधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये आम्ही १६२ असे महाराष्ट्र विकासआघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. आता विधानसभेत आज खरे शक्तिप्रदर्शन होणार असून, सत्ताधारी आमदारांची संख्या १६२ पेक्षा वाढणार का, याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचे बंड आणि महाविकासआघाडी
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत बंडखोरी करत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली. मात्र, हे सरकार साडेतीन दिवसच टिकले. गेल्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी अत्यंत घाईघाईने भल्या सकाळी पदाची शपथ घेत सरकार स्थापन केले. बहुमत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या निकालानंतर चित्रच पालटले. आधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे सरकार कोसळले. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली.
महाराष्ट्र विकासआघाडीने आपल्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्कवर शपथ दिली. तसेच, ३ डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते.
वळसे पाटील हंगामी विधानसभाध्यक्ष
दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची निवड झाली होती. तथापि, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, विश्वासदर्शक ठराव आणि नंतरच्या काळातील राजकीय घडामोडी पाहता या पदावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची शुक्रवारी निवड करण्यात आली.
हे मांडणार विश्वासदर्शक ठराव
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधी....
अधिक वाचा