By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 30, 2021 11:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवर पक्षाच्या राज्यातील सर्व मंत्र्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर आज तरी शिक्कामोर्तब होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
बैठकीला काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, के सी पाडवीसह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस प्रभारींचे महाराष्ट्रात ठाण
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यात ठाण मांडले होते. आमदारांच्या वारंवार भेटीगाठी घेऊन त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठा नेत्याची वर्णी लावल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची वर्णी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात विदर्भाला मिळालेल्या यशानंतर ‘काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष हवा. विदर्भात पक्षाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा’ अशी आग्रही मागणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी हायकमांडकडे केली.
विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीकडे मंत्रीपद असावं, अशीही त्यांची मागणी आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्यासाठी फील्डिंग करताना दिसत आहेत. याआधी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष ओबीसी समाजातून झाल्यास आनंदच होईल, असंही धानोरकर म्हणाले होते. त्यामुळे धानोरकरांचा रोख वडेट्टीवारांकडे असल्याचं स्पष्ट होतं.
वडेट्टीवार इच्छुक
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली होती. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
नाना पटोलेही शर्यतीत
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. पटोलेही विदर्भातील नेते आहेत, परंतु ‘मंत्रिपद असलेला प्रदेशाध्यक्ष’ असं धानोरकरांनी म्हटल्यामुळे त्यांच्या मनात नेमके कोण आहेत, हा प्रश्न निर्माण होतो.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन ठाकरे सरकार विरुद्ध कर्नाटक सरकार यांच्य....
अधिक वाचा