By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 08:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या भांडूपमध्ये सभा घेऊन सरकारवर सडकून टीका केली. नेते येतात, आश्वासन देतात आणि जातात पुढे त्याचं काहीही होत नाही लोकांना कायम गृहित धरलं जातं अशी टीका त्यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर बोलावं अशी अपेक्षा आहे. मात्र ते शेतकऱ्यांवर न बोलता काश्मीरवर बोलून दिशाभूल करताहेत असा आरोपही त्यांनी केला. लोकांनी आश्वासनांबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असंही ते म्हणाले. लोकांच्या संवेदना मेल्या असून लोकांना रागच येत नाही असंही ते म्हणाले. मनसेने हाती घेतलेली सर्व आंदोलने पूर्ण केलीत. मनसेमुळेच टोल बंद झाला असा दावाही त्यांनी केला. लोकांनी आमदार आणि खासदारांना प्रश्न विचारले पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारवर अंकुश ठेवायला विरोधी पक्ष हवाय. आज असा विरोधीपक्ष नाही. त्यामुळे मनसेला विरोधी पक्ष बनवा असा खुलासाही त्यांनी केला. लोक टीका करत आहेत त्यांना करू द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात, आणि लोकं पण प्रश्न विचारत नाहीत आणि इतर कुणीही सत्ताधाऱ्यांना एकही प्रश्न विचारायला तयार नाहीत की काय केलंत त्या आश्वासनांचं? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह एका सभेत बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि अमित शाह बोलत होते कलम 370 बद्दल.
महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच? आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार? कुठे गेलं तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे असं भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात म्हणलं होतं.काय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?
टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत? कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र? जे टोल ७८ बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झाले. त्रिभाषासूत्र ठीक आहे पण मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणल्यानंतर मी धोक्याची सूचना दिली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आज ते सर्व धोके खरे ठरत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत? अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये? चीड का येत नाहीये कोणाला? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर पेण येथील बोरगाव येथे लॅण्ड ....
अधिक वाचा