By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
लाव रे तो व्हिडीओ म्हणत लोकसभा निवडणूक गाजवणारे राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘अॅक्शन’ मोडमध्ये आलेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदा गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. पुण्यातही मनसेने ग्रामपंचायतीची जोरदार तयारी सुरु केलीये.
लोकसभा – विधानसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडीओ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत मोठी रंगत आली होती. तीच रंगत पुन्हा एकदा बघायला मिळणार अशी जोरदार चर्चा रंगलीय. त्याच कारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालयं. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागलेत.
23 डिसेंबरनंतर राज ठाकरेंचा मेळावा
पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. या सगळ्या ठिकाणी मनसेच्या पॅनेलतर्फे उमेदवार मैदानात असतील. त्यातच राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तालुकास्तरावर बैठका, मेळावे घेण्याचे आदेश दिलेत. तर राज ठाकरे 23 तारखेनंतर स्वत: पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहेत.
ग्रामंपचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेच्या गावपातळीवरील कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम राज ठाकरेंनी केले आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के उमेदवार उभे करणार असल्याची माहिती वागस्कर यांनी दिली.
मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु झाल्यात. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवलाय.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निवडणुकीचं महत्व वेगळं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपची ताकद गाव पातळीवर आहे. ग्रामीण भागात मनसेचे काम, मनसेचे संघटन उभ करण्याची संधी आहे. यानिमित्ताने मनसेला ग्रामीण भागातील पाया भक्कम करता येऊ शकतो, राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात मनसेचं फारसं स्थान नाहीये. या निवडणुकीत पहिल्यांदाच मनसे गावपातळीवरच राजकारण खेळणार आहे. मनसे जर गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरेल.
काँग्रेसने मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई ....
अधिक वाचा