By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 01:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होत आले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार युती 165, आघाडी 96 तर इतर पक्षांचे उमेदवार 27 जागांवर आघाडीवर आहेत. राज्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील लढत आहे. प्रत्येक फेरीचे निकाल जसे समोर येऊ लागले तसं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. कालपासूनच रोहित पवार आणि अजित पवार यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचे बोर्ड मतदारसंघात झळकले होते.
दरम्यान, रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. रोहित पवार यांनी म्हटलं की, आमची लढाई फक्त भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी होती. सध्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा गाठणं कठीण दिसत आहे. शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली असून त्यांचे 71 जागी उमेदवार पुढे आहेत. तर राष्ट्रवादीने तब्बल 50 हून अधिक जागी मुसंडी मारल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास ते सत्ता स्थापन करू शकतात.
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी शरद पवार घेतील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून एकप्रकारे भाजपला सूचक इशाराच देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्यांना सत्तेत मोठा वाटा मिळेल. युतीत लहान भावासारखी वागणूक मिळाल्यानं याआधीच सेनेत खदखद आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधी अनेकदा ही नाराजी उघड बोलून दाखवली होती.
दरम्यान, रोहित पवार म्हणाले की, मतदारसंघात वेगवेगळी राजकीय समीकरणं आतापर्यंत वापरली गेली आहेत. त्या समिकरणांना खोटं ठरवत आम्ही एकीचा, विकासाचा संदेश घेऊन आलो आहोत. आमचा हा दृष्टीकोन लोकांना पटला आणि आवडला. जातीय समीकरणांचं राजकारण तोडून लोकांच्या हिताचं राजकारण करून दाखवू ही आमची भूमिका लोकांना पटली म्हणून आम्हाला आघाडी मिळाली आहे. राज्याच्या विकासासाठी अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील. राज्यात विकासाला उंचावर नेण्याचं काम आम्ही नक्कीच करू, असंही रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन युती सरकारबद्दल लोकांच्या मनातली नाराजी निकालात दिसली असं म्हटलं आहे. पक्षांतर केलेल्यांनाी जनतेनं धडा शिकवला असंही ते म्हणाले. शिवसेनेसोबत आम्ही जाणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
2009 मध्ये आघाडीने 155 जागा जिंकल्या होत्या. भाजप शिवसेना युतीने 91 तर मनसेसह इतर पक्षांनी मिळून 42 जागा जिंकल्या होत्या. आघाडीने पुन्हा सत्ता हस्तगत केली होती. मात्र त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र जागा लढवल्या आणि सत्तांतर झाले. यामध्ये भाजपने सर्वाधिक 122 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यांना 155 वरून 90 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
2014 मध्ये निकालानंतर भाजप शिवसेनेनं युती केली होती. दरम्यान, अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकाच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच युतीतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे आता जर संधी मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता काबीज करू शकतात. यासाठी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांनी ठेवली तर त्यात अतिशयोक्ती नसेल. आघाडीसुद्धा यासाठी तयार होईल काऱण यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा उद्देश पूर्ण होईल.
कर्नाटकातही काँग्रेसने भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी जेडीएसलला पाठिंबा दिला होता. अर्थात तिथलं सरकार वर्षभर टिकलं. पण इथं शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन सत्तेसाठी आघाडीने हालचाली केल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही ऐतिहासिक निवडणूक ठरेल.
कळवा-मु्ंब्रा विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदव....
अधिक वाचा