By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सध्या राज्यभरात मराठा आरक्षणावरुन आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी करावं अशी देखील मागणी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत असलेले दोन्ही छत्रपती हे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर आले आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा टोलाही खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना शरद पवारांनी लगावला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक गट पडलेले दिसत आहेत. यामुळं या आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी करावं अशी मागणी पुढे येत आहे. याच संदर्भात बोलताना पंढरपूरमध्ये शरद पवार म्हणाले की, या दोघांनीच या लढ्याचे नेतृत्व करावे. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले?
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे दिला मात्र इतक्या दिवसात त्यांनी काय दिवे लावले असा सवाल शरद पवार यांनी केला. मुंबई पोलीस याचा तपास करीत होती मात्र केंद्राला ते पसंत नव्हते म्हणून त्यांनी दुसऱ्या एजन्सीला काम दिले. पण या प्रकरणात आत्महत्येचा विषय बाजूलाच राहिला असून लक्ष वळवण्यासाठी इतरचं गोष्टीचा तपास सुरु केल्याने सत्य बाहेर येईल का हाच प्रश्न निर्माण झाला आहे, असे शरद पवार म्हणाले.
आठवलेंना कुणीच गांभीर्याने घेत नाही
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रस्तावाबात बोलताना पवार म्हणाले, आठवले यांचा एकही आमदार अथवा खासदार नसून त्यांच्या बोलण्याला केंद्रात आणि राज्यात कोणीच गांभीर्याने घेत नाही. कृषी विधेयकाबाबत देशातील काही पक्ष न्यायालयीन लढाई लढायच्या तयारीत असताना आपल्याला हा प्रश्न घेऊन जनतेच्या न्यायालयात जावे असे वाटत असल्याचे पवार यांनी सांगितले. एका बाजूला हमीभावासाठी कायदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला कांदा निर्यातीवर बंदी घालायची अशी दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची असून या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व शेतकऱ्यांच्या हातात देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
संजय राऊतांची पाठराखण
संजय राऊत आणि फडणवीस भेटीबाबत बोलताना ही भेट राजकीय नव्हती आणि माझी मुलाखत घेतल्यानंतरच त्यांनी मुख्यमंत्री व भाजप नेत्यांची मुलाखत घेण्याचे जाहीर केल्याचे सांगत राऊत यांची पाठराखण केली. राज्यातील सरकार स्थिर असून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असेही पवार यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. मुंबईला वीज पुरवठा करणारी खाजगी कंपनी असून जवळपास साडेतीन हजार ग्राहकांना बिले गेली नव्हती मात्र माध्यमांना फक्त मंत्रीच दिसले असे सांगत माध्यमांनाही लक्ष केले. गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जनता अडचणीत असून ऑकटोबर मध्ये मुख्यमंत्री अजून शिथिलता देतील असे सांगताना काही शिष्टमंडळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत असून पुढील आठवड्यात हॉटेल वगैरेंना यात दिलासा मिळेल असे संकेतही पवार यांनी दिले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या ....
अधिक वाचा