By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2020 09:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. भालके यांचे पार्थिव शरीर आज (28 नोव्हेंबर) रोजी सकाळी 7.35 वाजता पुणे येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान टेंभुर्णी मार्गे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मार्गे ते पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ifO4z8cRCl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2020
“पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
“पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघुन गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचं. आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात,” असे ट्वीट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
ठाकरे सरकार घोटाळेबाज आमदार प्रताप सरनाईकांचं संरक्षण करतंय, असा गंभीर आ....
अधिक वाचा