By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 02:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवून राजभवनात नेल्याचा आरोप होत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला राजभवनात उपस्थित असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांनी याबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. यात आमदार राजेंद्र शिंगणे आणि सुनिल भुसारा यांचा समावेश आहे. संबंधित आमदारांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचंही स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील काही आमदारांना फसवून तेथे नेले होते, असे आरोप केला आहे.
आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “रात्री 12 वाजता अजित पवार यांचा फोन आला. सकाळी 7 वाजता त्यांनी बंगल्यावर महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा करण्यासाठी बोलावले. तसेच सकाळी 8 वाजता त्यांना बबनदादा यांच्या कारखान्यावर जायचं आहे, असंही सांगितलं. त्याप्रमाणे मी सकाळी 7 वाजता बी4 या बंगल्यावर पोहचलो. माझ्याआधी तेथे 2-3 आमदार आलेले होते. 15 मिनिटात तेथे 9-10 आमदार आले. आम्ही पावणेआठ पर्यंत तेथे बसलो. 7.45 वाजता मुंबईत कुठेतरी एका ठिकाणी बसायचं आहे, असा निरोप आला. तेथे सर्वांना एकत्र येण्यास सांगितलं. म्हणून आम्ही सर्व 10 जण तेथे जाण्यासाठी निघालो. मात्र, 15 मिनिटातच जेव्हा राजभवनावर पोहचलो. त्यावेळी आम्ही सर्वजण अस्वस्थ झालो.”
“आम्ही कोठे चाललो, कोणत्या कामासाठी चाललो याची काहीही कल्पना नव्हती. त्यानंतर आम्हाला राजभवनातील एका हॉलवर बसवण्यात आलं. 5 मिनिटातच देवेंद्र फडणवीस तेथे आले. चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन देखील तेथे आले. त्यानंतर 5 मिनिटात राज्यपालही तेथे आले. त्यांनी ताबडतोब शपथविधीचा कार्यक्रम घेतला. आम्हाला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. आम्ही एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार होतो. त्यात धनंजय मुंडे नव्हते. बंगल्यावर गेलो तेव्हा देखील धनंजय मुंडे नव्हते. आम्ही बंगल्यावर त्यांची चौकशी केली नाही. आम्ही बाहेरच बसलो होतो, असंही शिंगणे यांनी नमूद केलं.”
“आम्ही प्रचंड संभ्रमावस्थेत होतो. शपथविधी झाल्यानंतर आम्ही तात्काळ बाहेर पडलो”
आमदार सुनिल भुसारा म्हणाले, “शिंगणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच घडलं. आम्ही नेहमीच अजित पवारांना सकाळीसकाळी भेटतो. त्याप्रमाणेच आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांना देखील भेटणार होतो. सकाळी 7.30 वाजता अजित पवार यांना, तर 8.30 वाजता शरद पवार यांना भेटणार होतो. त्यामुळे सर्वच जण भेटणार असतील असं समजून आम्ही अजित पवारांना भेटायला गेलो. मात्र राजभवनात गेलो तर तेथे शपथविधीची तयारी दिसली. त्यानंतर आम्ही तेथून बाहेर पडलो. आम्हाला आधी काहीही माहिती नव्हती. आम्ही प्रचंड संभ्रमावस्थेत होतो. शपथविधी झाल्यानंतर आम्ही तात्काळ बाहेर पडलो आणि शरद पवार यांची भेट घेतली.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्....
अधिक वाचा