By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं आहे. त्यानंतर आज काँग्रेस नेते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सभागृहातील चिंता दूर झाली आहे. मात्र असं असलं तरीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच मंत्रिपदांबाबतचा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तसंच यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तीन नंबरला असणाऱ्या काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहणार असले तरीही खरी पॉवर राष्ट्रवादीकडेच राहील असं चित्र आहे.
दरम्यान, 2004 मध्येही राष्ट्रवादीने सत्तावाटपाचा हाच फॉर्म्युला वापरला होता. 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जाागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देऊन उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती.
उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारच प्रमुख दावेदार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं सत्तानाट्य आता अखेर संपलं आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही ट्विस्ट कायम आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला क्रमांक 3 च्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी पक्षानं २५ हजार रुपये हेक....
अधिक वाचा