By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2021 10:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
“पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजील उस्मानीला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही, याची जबाबदारी आमची”, असं भाजप आमदार नितेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत. शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत भाषण केलं होतं. त्याच्या भाषणातील काही मुद्द्यावर आक्षेप घेत भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे (Nitesh Rane on Sharjeel Usmani).
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
“शरजील नावाच्या कार्ट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊ”, असं नितेश राणे ट्विटरवर म्हणाले (Nitesh Rane on Sharjeel Usmani).
शरजील उस्मानीबाबत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, अशा विषयावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
स्वारगेट पोलिसांतही तक्रार
एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजील उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.
शरजील उस्मानी नेमकं काय म्हणाला?
‘भारतात स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घ्यायचं असेल तर दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्हाला म्हणावं लागेल की काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान मुर्दाबाद. तर तुम्ही राष्ट्रवादी आहात. तुम्ही त्या व्याख्येत बसता. पाकिस्तानातही अशीच एखादी व्याख्या असेल. साऊत आफ्रिकेतही असेल. मी राष्ट्रवादाला मानत नाही. आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. जुनैदला चालत्या रेल्वेमध्ये एक गर्दी 31 वेळा चाकू मारुन त्याची हत्या करते. तेव्हा कुणी अडवायला येत नाही. ते लोक तुमच्या आणि आमच्यातून येतात. हे लोक जे मॉब लिंचिंग करतात ते हत्या करण्याव्यतीरिक्त आपल्या घरी जाऊन काय करत असतील? हे लोक असं काय करतात की हत्या करुन आल्यानंतर ते आपल्यासोबत बसतात, उठतात, जेवण करतात, सिनेमा पाहायलाही जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी कुणाला तरी पकडतात, पुन्हा हत्या करतात आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगतात. ते प्रेम करतात, वडिलांचे आशीर्वाद घेतात. मंदिरात पूजाही करतात. पण पुन्हा बाहेर येऊन तेच करतात. हे सर्व इतक्या सहतेनं सुरु आहे की, लिंचिंग होतेय काही हरकत नाही. यापूर्वी मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यासाठी एखादं कारण दिलं जात होतं. तो एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. तो सीमीचा सदस्य आहे. या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध आहे. आता मात्र कुठल्याही कारणाची गरज नाही. मुस्लिम आहे मारुन टाकू’, असं वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेत केलं आहे. आणि त्याच्या याच वक्तव्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत सध्या मतदारांना केवळ ईव्ह....
अधिक वाचा