By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यता येणारी जाहीरातबाजी, प्रचारावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. निवडणुकीत कऱण्यात येणाऱ्या खर्चाचा हिशोब राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. महाराष्ट्रासोबत हरयाणातही विधानसभा निवडणून होत आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जमा खर्चाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. त्यानुसार गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी 280 कोटी रुपये खर्च केला. यापैकी 78 टक्के रक्कम ही प्रचारासाठी वापरण्यात आली. सर्वाधिक 186 कोटी 39 लाख रुपये खर्च भाजपने केला.
भाजपच्या तुलनेत इतर पक्षांनी कमी खर्च केला. प्रचारासाठी केलेल्या खर्चात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 41 कोटी 19 लाख रुपये वापरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं 30 कोटी 66 लाख तर शिवसेनेनं 14 कोटी 47 लाख रुपये खर्च केला. मनसेनं 1 कोटी 95 लाख रुपयांचा खर्च दाखवला आहे.
एकूण खर्चापैकी प्रसारमाध्यमांवर जाहिरात देण्यासाठी जवळपास 245 कोटी रुपयांचा खर्च पक्षांनी केला आहे. तर 19 कोटींचे प्रचार साहित्य आणि प्रचार सभांसाठी 16 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. तसेच प्रवास खर्च 41 कोटी, किरकोळ खर्च 22 कोटी आणि उमेदवारांना देण्यात आलेली किरकोळ रक्कम 18 कोटी इतकी होती.
राजकीय पक्षांच्या जमा खर्चाचे विश्लेषण करणाऱ्या अहवालात राजकीय पक्षांनी किती निधी मिळाला आणि तो खर्च कसा करण्यात आला याची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर)ने हा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणूक पार पडेपर्यंत राजकीय पक्षांना एकूण 464 कोटी 55 लाख रुपये निधी मिळाला होता. त्यातील 357 कोटी 21 लाख रुपये पक्षांकडून निवडणुकीत खर्च करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर 233 कोटी रुपयांपैकी 204 कोटी आणि प्रादेशिक स्तरावर 218 कोटींपैकी 136 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
निधी मिळवण्यात आणि खर्च करण्यात भारतीय जनता पार्टी अव्वल आहे. भाजपला सर्वाधिक 296 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसला 84 कोटी 37 लाख, राष्ट्रवादी काँग्रेसला 38 कोटी 10 लाख, शिवसेनेला 16 कोटी 36 लाख तर मनसेला 6 कोटी 76 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यापैकी भाजपने 217 कोटी तर काँग्रेसनं 55 कोटी 27 लाख, राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 कोटी 5 लाख, शिवसेनेनं 17 कोटी 94 लाख आणि मनसेनं 4 कोटी 9 लाख रुपये खर्च केले.
सर्वाधिक निधी मिळालेल्या आणि सर्वाधिक खर्च केलेल्या भाजपने त्यांच्या जमा खर्चाचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यास सर्वात उशिर केला. 75 दिवसांत हा जमा खर्चाचा हिशोब द्यावा लागतो. मात्र, भाजपने यासाठी 198 दिवस घेतले. त्याखालोखाल भाकपने 197 दिवस, काँग्रेसनं 181 दिवस, राष्ट्रवादी काँग्रेसनं 80 दिवस तर मनसेनं 62 दिवसांनी जमा खर्च दिला होता. आतापर्यंत जनता दल निरपेक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांनी त्यांच्या निधी आणि खर्चाचा हिशोब दिलेला नाही.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महारा....
अधिक वाचा