By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच ‘मातोश्री’ची पायरी चढणार आहेत. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. आज दुपारी एक वाजता प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच जाणार आहेत. ही महत्त्वाची आणि ऐतिहासिक भेट आहे. या भेटीत राजकीय चर्चा होईलच, पण ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दलित राजकारणाच्या अनुषंगाने गेल्या एक-दीड वर्षात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जरी यश मिळालं नसलं, तरी वंचितचा फटका भल्याभल्यांना बसल्याचं चित्र आहे. एकीकडे ही पार्श्वभूमी आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व नेत्यांना भेटून आपली सर्वसमावेशक प्रतिमा उभी करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान, करावयाच्या नियोजनबाबतही प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात भीमा कोरेगाव इथला कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जाते. त्याचा आढावा घेण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.
मुंबई - भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्यासाठ....
अधिक वाचा