By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा विस्तार अखेर सोमवारी पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ३६ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब केल्याने शिवसेनेत सारे अचंबित झाले. संजय राऊत शपथविधीला गैरहजर राहिल्याने नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली.
मात्र संजय राऊत यांना आपल्या अनुपस्थितीबाबत स्वत: खुलासा केला आहे. आपण कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला जात नसल्यानेच गैरहजर होतो असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं. यानंतर पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहण्याबद्दल विचारलं. यावर त्यांनी उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते असं त्यांनी म्हटलं.
विरोधकांनी शपथविधीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “चहा-पानावर बहिष्कार टाकणं ठीक आहे पण शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची पद्धत चुकीची आहे. विरोधी पक्षाची जनतेशी बांधिलकी आहे. त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसू नये अन्यथा ते बोथट होईल. जनतेचा विरोधी पक्षावरील विश्वास उडून जाईल”.
“विरोध पक्ष सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडण्यास तयार नसेल तर ही पोकळी दुसऱ्या कोणाला तरी भरुन काढावी लागेल,” असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं. तसंच मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही नाराजी नसल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान ८ तारखेला औद्योगिक बंद पुकारण्यात आला असून त्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. देशात बेरोजगारी वाढली असून, आर्थिक कणा मोडला असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. कामगार संघटनांचे नेते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना भेटून आंदोलनाची व्याप्ती वाढावी यासाठी काम करतील अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथवि....
अधिक वाचा