By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 02:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या माजी बीएसएफ अधिकारी तेज बहादूर यादव यांना मोठा झटका बसलाय. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे उमेदवार तेज बहादूर यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आलीय. यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदींना टक्कर देणार आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी बुधवारी दुपारी ११ वाजता तेज बहादूर यादव आपल्या वकिलांसोबत आरओंना भेटण्यासाठी दाखल झाले होते. या भेटीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी यादव यांचा अर्ज रद्दबादल ठरवला. यावेळी, तेज बहादूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. यामुळे पोलिसांनी समर्थकांना कार्यालयाच्या बाहेर काढलं.
उमेदवारी अर्ज का झाला रद्द?
तेज बहादूर यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आल्याबद्दल दोन उमेदवारी अर्जात वेगवेगळी माहिती देण्यात आली होती. यादव यांनी 'भारत सरकार किंवा राज्य सरकार अधीन पद धारण करण्यादरम्यान भ्रष्टाचार किंवा अभक्तीच्या कारणामुळे पदच्युत करण्यात आलं का?' या प्रश्नाच्या उत्तरात यादव यांनी 'होय' असं पहिल्या उमेदवारी अर्जात म्हटलं होतं. परंतु, दुसऱ्या नामांकनपत्रात चुकीनं या प्रश्नाला 'होय' असं उत्तर लिहिल्याचं म्हटलं होतं. आपल्याला भ्रष्टाचार किंवा अभक्तीसाठी बडतर्फ करण्यात आलं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर तेज बहादूर यादव यांना २४ तासांत बीएसएफकडून नाहरकत प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
यादव यांच्यावर बडतर्फीची कारवाई का?
काही वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेज बहादूर यादव एका व्हिडिओद्वारे भारतीय लष्करातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवण्यात येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. यानंतर झालेल्या चौकशीअंती २०१७ मध्ये तेजबहादूर यांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले होते.
पंतप्रधान झाल्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदी पहिल्यादांच अयोध्येत दाखल झाले....
अधिक वाचा