By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 02:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा बहुतांश कौल जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसचा सुपडासाफ करत पुन्हा एकदा देशाच्या सत्तेमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. लोकसभा निकालांमध्ये 350 आकडा पार करत भाजपाप्रणित आघाडीने बहुमत पार केले आहे. काँग्रेसप्रणित आघाडीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. एनडीए जवळपास 300 चा बहुमताचा आकडा पार करेल असं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन सांगण्यात आलं होतं. आजच्या निकालामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे तर विरोधी पक्षाचा उत्साह कमी झाल्याचं दिसून येत आहे. नेमके एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले आणि निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालात एनडीएला बहुमत मिळालं हे स्पष्ट झालं आहे. विरोधक नेमकं कुठे कमी पडले याची कारणे शोधली जाऊ शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील प्रचार पाहता ही 5 प्रमुख कारणे समोर येत आहेत.
देशभक्तीचा मुद्दा
पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने घुसून एअर स्ट्राईक केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय लोकांच्या पसंतीस पडला. त्यात मोदींनी आणि भाजपाने या एअर स्ट्राईकचा पुरेपूर वापर निवडणुकीच्या प्रचारात करुन घेतला. देशभक्ती, दहशतवाद हे मुद्दे प्रामुख्याने निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनले. नवीन मतदारांना आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जवानांसाठी मतदान करा असा उल्लेख केला त्यामुळे देशभक्तीचा मुद्दा हा भाजपाच्या विजयाचं प्रमुख कारण होऊ शकतं.
मोदींशिवाय देशाला पर्याय नाही
भाजपाने निवडणुकीच्या प्रचारात आणखी एक मुद्दा प्रामुख्याने घेतला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपद यशस्वीरित्या सांभाळेल असा कोणताही नेता विरोधी पक्षात नाही. मोदींना पर्याय कोण असा प्रचार भाजपा कार्यकर्त्यांकडून केला गेला. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना पुढे करावं यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकमत नव्हतं. त्यामुळे There is no alternative या फॅक्टरमुळे विरोधकांना मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी असंही लोकांच्या मनात होतं त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला.
राफेल मुद्द्यांवरुन काँग्रेसच्या मोहिमेला भाजपाचं आक्रमक उत्तर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीला राफेल भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रीत केला. त्यावरुन मोदींविरोधात चौकीदार चोर है अशा घोषणाही राहुल गांधी यांनी जाहीर व्यासपीठावरुन दिल्या. राहुल गांधी यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही मै भी चौकीदार अभियान आणलं. यामाध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच मै भी चौकीदार म्हणून प्रचार करु लागले. दरम्यानच्या काळात चौकीदार चोर है या घोषणेवरुन सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांना माफी मागावी लागली. त्यानंतर राफेल मुद्दा निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर पडल्याचं दिसलं.
प्रचारात महागाईचा मुद्दा नाही
प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांकडून वापरला जातो. सामान्य मतदारांच्या जीवनाशी जोडलेला हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत कुठेही दिसला नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात हा मुद्दा प्रामुख्याने प्रचाराचा भाग बनविला होता. मात्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे महागाईवर नियंत्रण मिळालं आणि हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात आलाच नाही असा दावा भाजपाकडून करण्यात आला.
उज्ज्वला, हर घर शौचालय, पंतप्रधान आवास योजना लोकोपयोगी योजना
भाजपा सरकारने गेल्या 5 वर्षात अनेक योजना आणल्या. या योजनांचे मार्केटींग करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुकीच्याआधी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार येतील. असंघटीत कामगारांना पेन्शन दिली जाईल अशा घोषणा केल्या. 5 वर्षात स्वच्छ भारत अभियान सुरु करुन गावागावांत शौचालय निर्मिती, उज्ज्वला योजनेतंर्गत गॅस सिलेंडर, प्रत्येकाला घर यासारख्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यात भाजपाला यश आलं. विरोधकांनी या योजना किती यशस्वी झाल्या याचा कुठेही प्रचारात वापर केला नाही त्यामुळे भाजपासाठी या योजना फायदेशीर ठरल्या.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, देशात ....
अधिक वाचा