By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 03:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पत्रकार परिषद घेऊन एकाही प्रश्नाला उत्तर न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शरसंधान साधलं. मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार असल्याची टीका राज यांनी केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नव्हती, मग मोदी पत्रकार परिषदेला कशासाठी आले, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी संवाद साधताना मनसे प्रमुखांनी मोदींचा समाचार घेतला. पाच वर्षे सत्तेत असूनही मोदी त्यांनी दिलेल्या आश्वासनांबद्दल अवाक्षर काढत नाहीत. मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र तिथे मोदी काहीच बोलत नाहीत. हीच मोदींची मानसिक हार आहे. यापुढची हार 23 मे रोजी होईलच, अशा शब्दांत राज यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. पंतप्रधान मोदी पत्रकारांना इतके का घाबरतात, त्यांनी असं काय केलं आहे की त्यामुळे त्यांना पत्रकारांची इतकी भीती वाटते, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. पंतप्रधानांची कालची पत्रकार परिषद ही मौन की बात होती, असा टोलादेखील त्यांनी लगावला. काल पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान म्हणून मोदींची ही पाच वर्षातील पहिलीच पत्रकार परिषद होती. मात्र यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी दिली. पत्रकारांनी थेट विचारलेले काही प्रश्न पंतप्रधानांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवले. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. यानंतरही एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत शहांनी त्या प्रश्नाचं उत्तरदेखील स्वत:च दिलं.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्....
अधिक वाचा