कोर्टात हजर न राहिल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी
By
DAYANAND MOHITE | प्रकाशित:
एप्रिल 23, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकांनी राज्यासह देशभरात वातावरण तापलेले आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चादरम्यान वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद कोर्टाने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर समावेश असलेल्यांना कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, संजत राऊत आणि समाविष्ट इतरांना कोर्टाकडून समन्स बजावूनही कोर्टात हजर न राहिल्याने वॉरंटचा आदेश पारित करणं आवश्यक असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलं आहे.कोपर्डी येथे शालेय विद्यार्थिनीचा बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांना राज्यभरात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र, याचदरम्यान शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'ने या मोर्चाची टिंगल करणारे व्यंगचित्र छापले होते. याविरोधात मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.