By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी मौन बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घातला जाण्याची शक्यता आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयूपर येथे संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून यासंदर्भातील संकेत दिले.
यावेळी त्यांनी म्हटले की, आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल. यामध्ये भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचा कयास बांधला जात आहे.
उदयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चार दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण शिबिरात ३०० पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा मार्गी न लागल्यामुळे संघाने भाजप सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. तर लोकसभा निवडणुकीनंतर कोणाचेही सरकार आले तरी राम मंदिराच्या कामाला सुरुवात करणारच, असे संघाच्या एका नेत्याने म्हटले होते. मात्र, यानंतर लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान संघाकडून राम मंदिराविषयी कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते.
मात्र, आता भाजपने पुन्हा एकदा बहुमताने सत्ता प्राप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्त्व आले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर-बाबरी मशीद हा खटला प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्याशिवाय राम मंदिरसाठी अध्यादेश काढता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकार आपल्या भूमिकेत बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेते....
अधिक वाचा