By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
अहमदनगर - 'मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, मला दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे. माझे काही बरेवाईट झाले तर त्याला मीच जबाबदार राहीन', असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार विराजमान झालं आहे. या सरकारला जवळपास एक महिना पूर्ण होत आला असून नव्या सरकारने राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने राज्यातील ९० मान्यवरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला व आवश्यकतेनुसार सुरक्षेत बदल केले आहेत. यात अण्णा हजारे यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णा हजारे यांना आधी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यात बदल करून आता झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
सरकारने एकीकडे अण्णांच्या सुरक्षेत वाढ केली असताना अण्णांनी यावर आज आपली भूमिका लिखित स्वरूपात स्पष्ट करून मला कोणत्याही सुरक्षेची गरज नसल्याचे म्हटले आहे. अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले आहे. माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे. माझी सुरक्षा काढण्यात आल्यानंतर माझे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी माझीच असेल, असेही अण्णांनी या पत्रात नमूद केले आहे. यावर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेतं, हे पाहावे लागणार आहे. या पत्राबाबत सरकारकडून वा गृह मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याने नॉर्वे ये....
अधिक वाचा