By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. येणाऱ्या आठवड्यात उर्वरित दोन स्थानांवर कोणत्या संघांचे नाव असेल हे स्पष्ट होईल. सनरायझर्स हैदराबाद संघाने सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय मिळवून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा धुळीस मिळवल्या. त्यामुळे दोन जागांसाठी उर्वरित पाच संघांमध्ये आता चढाओढ पाहायला मिळणार आहे. कोणाला किती आणि कशी संधी आहे ...
राजस्थान रॉयल्स
स्टीव्हन स्मिथने नेतृत्वाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. पण, उशीराने गवसलेल्या सूरानंतरही त्यांची प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी फार कमी आहे. आज त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे आणि त्यात पराभव झाल्यास बंगळुरूनंतर प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर जाणार तो दुसरा संघ ठरू शकतो. पण, विजय मिळवल्यास त्यांच्या खात्यात 13 सामन्यांत 12 गुण होतील आणि अखेरच्या सामन्यातील विजयाबरोबर त्यांची गुणसंख्या 14 ही होईल. त्यानंतर अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यांच्याकडे अंतिम चार संघात प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. एक विजय आणि त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित होईल. त्यांची सरासरीही +0.347 अशी आहे. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत एक विजय मिळवावा लागणार आहे. पण, त्यांनी दोन्ही सामने गमावले तरीही नेट रन रेटच्या जोरावर हा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवू शकतो. दुसरीकडे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांना अव्वल दोन स्थानावर झेप घेता येईल.
कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाताच्या संघातने 12 सामन्यांत 5 विजय मिळवत 10 गुणांची कमाई केली आहे. त्यांची सरासरीही +0.100 अशी ठिकठाक आहे आणि त्यामुळेच त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. कोलकाताला सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. पण, मुंबईविरुद्धच्या विजयाने त्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत त्यांना किंग्स इलेव्हन पंजाब व मुंबई इंडियन्सचा पराभव करावा लागणार आहे. हे सामने जिंकून कोलकाता 14 गुणांची कमाई करेल आणि नेट रन रेटच्या जोरावर कदाचीत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवू शकेल.
किंग्स इलेव्हन पंजाब
पंजाबलाही उशीराने सूर गवसला आहे. 12 सामन्यांत त्यांना केवळ 5 विजय मिळवता आले आहेत आणि त्यांची सरासरी ही -0.296 अशी आहे. हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. उर्वरित दोन सामन्यांत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवून सरासरीत बदल करावा लागेल. अन्यथा विजय मिळवूनही त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश अशक्यच राहिल. त्याचबरोबर अन्य सामन्यांच्या निकालांवर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सनराइझर्स हैदराबाद
हैदराबादने 12 सामन्यांनंतर 12 गुणांची कमाई केली आहे आणि त्यांची सरासरीही +0.709 अशी सकारात्मक आहे. त्यात पंजाबविरुद्ध विजय मिळवून त्यांनी प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पण तरीही त्यांना उर्वरित सामन्यांत जोर लावावा लागणार आहे. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत त्यांची खरी कसोटी लागणार आहे.
आपल्या रंगीन सवयींमुळं शेन वॉर्नला वर्ल्ड कपलाही मुकावे लागले होते. 2003 साली ....
अधिक वाचा