By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 31, 2020 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकयो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२१ साली २३ जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्ट २०२१ ला या ऑलिम्पिकची सांगता होईल. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे टोकयो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ऑलिम्पिकसोबतच २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत पॅरालम्पिक खेळवण्यात येणार आहेत. टोकयो ऑलिम्पिकचे प्रमुख योशिरो मोरी यांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी २४ जुलैला टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार होती. १६ दिवस ही स्पर्धा चालणार होती.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद आणि जपान यांना ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ऑलिम्पिक होईल, असं वाटत होतं. पण कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे अखेर ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑलिम्पिक ही क्रीडा विश्वातली सगळ्यात मोठी आणि मानाची स्पर्धा आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचं टोकयो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी मान्य केलं आहे. ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी टोकयोला १२.६ बिलियन डॉलर एवढा खर्च येणार होता.
ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे टोकयोमधल्या हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवसाय यांना फटका बसणार आहे. ऑलिम्पिकसाठी अनेकांनी हॉटेल आणि वाहतुकीसाठी बूकिंग करुन ठेवलं होतं. तसंच ऑलिम्पिकची तिकिटंही काढून ठेवली होती. स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मिळणार का? याबाबात अनिश्चितता आहे.
२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर यश....
अधिक वाचा