ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गर्वाचं घर खाली करणारे ‘अजिंक्य’ वास्तूपुरूष!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 20, 2021 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गर्वाचं घर खाली करणारे ‘अजिंक्य’ वास्तूपुरूष!

शहर : मुंबई

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावसकर चषक उंचावला. आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत होईल, असा दावा अनेक ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी केला होता. या क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचं खच्चीकरण करण्यासाठी तिखट शब्दांचा वापर केला होता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नव्या दमाच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर चषक जिंकून सर्वांची तोंडं बंद केली आहेत. विशेष म्हणजे ब्रिस्बेन येथील गाबाच्या खेळपट्टीवर केल्या 32 वर्षांमध्ये कोणताही संघ ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करु शकला नव्हता. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ, त्यांचे प्रशिक्षक, संपूर्ण संघव्यवस्थापन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सर्वच जण आपणच गाबाच्या मैदानात अजिंक्य आहोत अशा अविर्भावात वक्तव्ये करत होते, वागत होते. परंतु अजिंक्य रहाणेच्या नव्या दमाच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन्सच्या गर्वाचं घर खाली केलं आहे.

टीम इंडियाने सर्वांची भाकितं खोटी ठरवली

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ब्रॅड हॅडिन आणि मार्क वॉ, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांना असं वाटतं होतं की भारतीय संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशा फरकाने पराभूत होईल. कांगारु भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देतील. तसेच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आणि स्टिव्ह स्मिथलाही गाबाच्या मैदानात आपण जिंकू असा विश्वास होता. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लेंगर यांनाही विश्वास होता की, त्यांचा संघ ब्रिस्बेन कसोटीत जिंकेल. परंतु टीम इंडियाने या सर्वांची भाकितं खोटी ठरवली.

मायकल वॉनचं तोंड बंद केलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने गमावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला होता की, विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये पराभूत होईल. वॉनने एक ट्विट केलं होतं, त्यात त्याने म्हटलं होतं की, “मला असं वाटतं की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व मालिकांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने पराभूत होईल. वॉनला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणारा संघ आवडत नाही. ही जुनी मानिसिकता त्याला पटत नाही. त्याने म्हटलं की, भारतीय संघ मला जुनी रणनीति फॉलो करणारा वाटला. भारताकडे केवळ पाच गोलंदाजांचा पर्याय आहे आणि भारताची फलंदाजी फार बरी नाही. भारताला 50 षटकं गोलंदाजी करण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागला, मला हेदेखील आवडलेलं नाही. भारतीय संघाचं क्षेत्ररक्षणही फार बरं नाही. गोलंदाजी सामान्य आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ मात्र जबरदस्त आहे.” हाच मायकल वॉन भारताने मालिका जिंकल्यानंतर त्यांचं कौतुक करतोय. त्यामुळे वॉनचं आता तोंड बंद झालं आहे, असं म्हणू शकतो.

भारतीय संघाकडून वाचाळवीरांना चोख प्रत्युत्तर

भारतीय संघ अ‍ॅडलेड कसोटीत पराभूत झाला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. तसेच या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला होता की, “फलंदाजीत भारतीय संघ खूपच कमकूवत आहे. तसेच पुढील तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीदेखील या संघात नसणार. विचार करा हा संघ पुढील सामन्यात कसा खेळेल? भारतीय संघ सध्या खूप अडचणीत आहे.”

अ‍ॅडलेड कसोटी भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला होता की, “भारतीय संघ सध्या कमकुवत आहे. अ‍ॅडलेडमधील पराभवाने भारतीय खेळाडू बॅकफुटवर आहेत. तसेच पुढील सामन्यांमध्ये विराट कोहलीदेखील संघात नसेल. अशा वेळी भारतीय संघाला व्हाईटवॉश देण्याची नामी संधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे आहे.” तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ म्हणाला होता की, “अ‍ॅडलेड कसोटीत खूप वाईट पद्धतीने हरल्यानंतर हा संघ पुन्हा कमबॅक करेल असं मला तरी वाटत नाही.” ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडून ब्रॅड हॅडिन म्हणाला होता की, “चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ केवळ एक सामना जिंकू शकला असता. केवळ अॅडलेडमध्ये त्यांना जिंकता आलं असतं. परंतु आता अॅडलेडचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाकडे पुनरागमन करण्याची संधीच उरलेली नाही.” या सर्व वाचाळवीरांना भारतीय संघानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

गाबाचा माज उतरवला

सिडनी कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या हातात होता. परंतु हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांनी तब्बल 42 षटकं मैदानात उभं राहून हा सामना ड्रॉ केला. भातासाठी हा सामना ड्रॉ असला तरी कांगारुंसाठी तो सामना परभवाइतकाच कडू होता. या सामन्यात जेव्हा हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन बाद होत नाहीत, हे लक्षात आल्यावर त्या दोघांचं लक्ष विचलित करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने स्टंप्समागून बोलंदाजी सुरु केली. दोन्ही फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही फलंदाजांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. भारताने हा सामना ड्रॉ केला. सामना संपल्यानंतर टीम पेनने रविचंद्रन अश्विनला आव्हान दिलं होतं की, “गाबाच्या मैदानावर भेटू. तिथे खेळून दाखव. अश्विननेही त्याला “भारतात ये मग तुझी कारकीर्द कशी खराब होते ते बघ, असं प्रत्युत्तर दिलं. परंतु ऑस्ट्रेलियन कर्णधाराला गाबाच्या मैदानावर जिंकण्याचा जो माज होता, तो त्याच्या वक्तव्यातून दिसून आला. हाच माज आज अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने उतरवला आहे.

गांगुली-द्रविडच्या टीम इंडियाने पाया रचला

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांगारुंचा हा माज आज एका सामन्यामुळे किंवा या एका बॉर्डर गावसकर मालिकेमुळे उतरलेला नाही. त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने गेली दोन-तीन दशकं मेहनत घेतली आहे. त्याची सुरुवात केली ती व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणने (VVS Laxman). ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर लक्ष्मणने सर्वात आधी आक्रमण केलं. त्याच्यानंतर टीम इंडियाचा ‘द वॉल राहुल द्रविडने त्यांच्याच गडावर द्विशतकी झेंडा रोवला. क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरने ऑफसाईडला एकही ड्राईव्ह न लगावता शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध खेळी साकारून क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. आक्रमण हेच सर्वोत्तम बचावतंत्र धमन्यांमध्ये असलेल्या मुलतानचा सुलतान विरेंद्र सेहवागने कुटलेल्या धावा, प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुलीने झळकावलेलं शतक आणि कांगारुंच्या भूमीवर केलेल्या दादागिरीने कांगारुंच्या गर्वाचं घर खाली करण्यास सुरुवात केली.

विराट कोहलीच्या टीम इंडियाने ‘गर्वाचं घर खाली करण्याचं अभियान बळकट केलं

ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हटलं की स्लेजिंग आलंच. त्यांच्या स्लेजिंगपासून आतापर्यंत कोणीही वाचलेलं नाही. परंतु त्यांच्या अरे ला कारे करण्यास झहीर खानने सुरुवात केली. खेळपट्टीवरील त्यांच्या यष्ट्यांचा पाया कमकुवत केला. अजित आगरकरने त्यांची इनिंग्ज खोलता येते हे दाखवून दिलं. अनिल कुंबळेने कांगारुंना त्यांच्या फिरकीत गुंडाळलं. इशांत शर्माने त्यांच्या दांड्या गुल करण्यास सुरुवात केली. रनमशीन विराट कोहलीने दोन्ही डावात शतक करून ‘गर्वाचं घर खाली या भारताच्या अभियानाला बळकटी दिली. रहाणेनेही शतक करत अजून एक वीट रचली. विराटने केवळ त्यांना बॅटने उत्तर दिलं नाही. तर त्यांच्या स्लेजिंगलाही उत्तर दिलं. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी खेळाडू विराटच्या स्लेजिंगला घाबरू लागले आणि विराटला डिवचू नका असा सल्ला विद्यमान खेळाडूंना देऊ लागले. अशी दहशत विराटने कांगारुंच्या मनात निर्माण केली. विराटने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनाही जशास तसे उत्तर दिले.

अखेर अजिंक्य रहाणेच्या नवख्या टीम इंडियाने जिरवली

आम्हीही स्लोवर वन, बाऊन्सर आणि बेस्ट यॉर्कर टाकून तुम्हाला गोत्यात आणून शकतो हे जसप्रीत बुमराहने दाखवून दिलं. राहुल द्रविडप्रमाणे दिवसभर खेळपट्टीवर ठाण मांडून चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात नवी भिंत उभारली. नव्या दमाच्या खेळाडूंनीही कांगारुंच्या स्लेजिंगचा, बाऊन्सर्सचा आणि गोलंदाजांच्या हल्ल्याचा सामना केला. अनेक खेळाडू जखमी झाले, पण तरिही लढले आणि जिंकलेदेखील. यंदा भारतीय संघासोबत विराट कोहली नव्हता तर रिषभ पंतने कांगारुंच्या स्लेजिंगला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यष्टीरक्षण करत असताना त्यानेही कांगारुंना डिवचून जेरीस आणलं. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनप्रमाणे नुसतीच बोलंदाजी केली नाही, तर फलंदाजीतही दम दाखवला. सिडनी असो किंवा ब्रिस्बेन, पंतने कांगारुंना दिवसा तारे दाखवले.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या गर्वाचं घर आज असं एका दिवसात खाली झालेलं नाही. गेल्या तीन दशकांमध्ये लक्ष्मण, द्रविड, सचिनपासून ते कोहली, अजिंक्य आणि पतंपर्यंत प्रत्येकाने एकेक वीट रचली आहे. प्रत्येकाने योगदान दिलं आहे. मार झेलला आहे आणि आपला दम दाखवला आहे. ही कामगिरी करण्यासाठी तब्बल दोन-तीन दशकं खर्च झाली आहेत.

मागे

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला
Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीतील (Aus vs Ind 4th Test) पाच....

अधिक वाचा

पुढे  

#Ind vs Eng | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आठवडाभर क्वारंटाईन
#Ind vs Eng | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आठवडाभर क्वारंटाईन

ऑस्ट्रेलियाला चितपट केल्यानंतर भारतीय संघ पाहुण्या इंग्लंडविरोधात (Team India vs E....

Read more