By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेला सामना वेलिंग्टनमध्ये पार पडला. मालिकेतील चौथा टी २० सामनाही थरारक झाला असून हा सामनाही टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. भारताने या सामन्यातही हॅमिल्टनच्या सामन्याची पुनरावृत्ती करत, सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळविला आहे.
भारताने निर्धारित २० षटकात ८ बाद १६५ धावा केल्या. मात्र हे आव्हानही पार करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं. न्यूझीलंडने २० षटकात ७ बाद १६५ धावा केल्या. त्यामुळे सलग दुसरा टी २० सामनाही टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १३ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला १४ धावांची गरज होती.
पहिल्या सामन्यातील विजयीवीर रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिली गेली, भारताकडून के. एल.राहुल आणि कर्णधार विराट कोहली मैदानात उतरले होते. राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मग स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहलीने चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवला. पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चारही सामने विराट संघाने जिंकले आहेत. तेव्हा आता रविवारी होणार्या पाचव्या सामन्यात विराटचा संघ न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार का? ही उत्सुकता आहे.