By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. दरम्यान, 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवावं, अशी मागणी तसेच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याप्रकरणावर आता भारतीय संघाच्या निवड समितीने भाष्य केलं आहे.
निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन सामने खेळवले जाणार असून त्यापैकी पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तर अजिंक्य रहाणेच दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यात म्हटलंय की, रोहित शर्माकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रोहित शर्माचे सराव करतानाचे दोन फोटो शेअर केले होते. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने म्हटलंय की, इंजिन स्टार्ट होतंय आणि जे पुढे होणार आहे त्याची ही छोटी झलक आहे. मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी अजून 6 दिवस आहेत त्यामुळे भारतीय संघ आराम करत असताना रोहित शर्मा मात्र मैदानात सराव करताना दिसला.
आयपीएलमध्ये दुखापत
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेदरम्यान, रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात रोहितची निवड करण्यात आली नव्हती. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
टेस्टसाठी ‘टेस्ट’
रोहितला तिसऱ्या कसोटीत खेळणं वाटत तेवढ सोपं नाही. रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टवर रोहितचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु रोहितकडे आता संघाचं उपकर्णधारपद दिलंय याचा अर्थ त्याला तिसऱ्या कसोटी अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
रोहितसाठी कोणाला डच्चू मिळणार?
रोहितला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर संघातून कोणाला वगळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. तिसऱ्या सामन्यात मयंक अग्रवालला डच्चू मिळू शकतो. मयंक पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. यानंतरही त्याला दुसऱ्या कसोटीत संधी दिली. मात्र या सामन्यातही तो अपयशी ठरला. यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहितसाठी मयंकला बकरा केला जाऊ शकतो.
सिडनी टेस्ट जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिका खेळल्यानंतर आता उभय संघांमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक पराभव झाला. मात्र, दुसऱ्या कसोटीत भारताने त्या पराभवाचा बदला घेतला. भारताने दुसरी कसोटी 8 विकेट्सने जिंकली. सध्या दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे.
रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी
रोहित ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 31 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. नाबाद 63 ही त्याची ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
रोहितची कसोटी कारकीर्द
रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नाही. आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 46.54 च्या सरासरीने 2141 धावा जमवल्या आहेत. त्यामध्ये 6 शतकं, 1 द्विशतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. परंतु कसोटीमध्ये रोहित 2019 पूर्वी भारतीय संघात नव्हता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुस....
अधिक वाचा