By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
2 एप्रिल 2011 या तारखेला भारतीय क्रिकेट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयसीसी वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे या संघातील सर्व सदस्य आठ वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. हा वर्ल्ड कप महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी विशेष होता, कारण लहानपणापासून त्याने पाहिलेले स्वप्न 2 एप्रिल 2011 ला पूर्ण झाले होते. तेंडुलकरच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी होती आणि डोळ्यांत आनंदाश्रू... या अविस्मरणीय दिवसाच्या निमित्ताने आणि आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर तेंडुलकरने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
महेला जयवर्धनेच्या 103 धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने 6 बाद 274 धावा उभ्या केल्या. कर्णधार कुमार संगकारानेही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या लक्ष्याचा पाठला करताना मात्र विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दिग्गज स्वस्तात माघारी परतले. पण, गौतम गंभीर एका बाजूने खिंड लढवत राहिला. त्याने विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी 83 आणि महेंद्रसिंग धोनीसह चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. दुर्दैवाने 97 धावांवर तो माघारी परतला. धोनी आणि युवराज सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने 6 विकेटने हा सामना जिंकला. तेंडुलकरने भारतीय संघाला तीनाचे चार करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला,'' 2 एप्रिल 2011 या दिवसाचे माझ्या आयुष्यात काय स्थान आहे, हे मी शब्दात सांगू शकत नाही. या दिवसाचे वर्णन करताना सुरूवात नक्की कुठून करू हेच कळत नाही. पण, तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे.''
तेंडुलकरने भारतीय संघाला आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही हटके शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाने 1983 ( वन डे), 2007 ( ट्वेंटी-20) आणि 2011 ( वन डे) असे तीन वर्ल्ड कप जिंकले आहेत आणि त्याची खूण म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) संघाच्या जर्सीवरील लोगोवर तीन स्टार कोरले आहेत. हाच धागा पकडून तेंडुलकर म्हणाला,'' इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण, जे खेळाडू या संघात निवडले जातील ते आपले असतील. त्यांना पूर्णपणे पाठींबा द्यायला हवा. जर तुम्ही नीट पाहाल तर भारतीय संघाच्या जर्सीवर बीसीसीआयचा लोगो आहे, त्यात तीन स्टार आहे. या तीन स्टारला चार बनवूया.''
आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग होत असल्याचा आरोप ललित मोद....
अधिक वाचा