By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 23, 2019 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
विश्वचषक स्पर्धेत शनिवारी मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा अवघ्या पाच धावांनी पराभव केला. या रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. मात्र, अखेरच्या क्षणी ब्रेथवेट बाद झाला आणि विंडिजचा खेळ संपला. ब्रेथवेटने ८२ चेंडूत १०१ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्यासाठी विंडिजला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत वाईट झाली. अवघ्या सात धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज माघारी परतले होते. मात्र, कर्णधार केन विल्यम्सन पुन्हा एकदा संघाचा तारणहार ठरला. १५४ चेंडूत विल्यमसनने १४८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विल्यम्सनच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची फलंदाजीही पार ढेपाळली होती. वेस्ट इंडिजने १६४ धावांवर सात विकेट गमावल्या होत्या. मात्र, कार्लोस ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजांच्या साथीने किल्ला लढवत वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अखेरच्या क्षणी वेस्ट इंडिजला ७ चेंडूत ६ धावांची गरज होती. त्यावेळी कार्लोस ब्रेथवेटने मोठा फटका मारला. मात्र, लाँग ऑनला उभ्या असलेल्या ट्रेंट बोल्टने सीमारेषेवर अलगद त्याचा झेल घेतला.या पराभवाबरोबरच वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. विश्वचषक स्पर्धेतील हा विंडिजचा चौथा पराभव आहे. त्यांनी केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे विडिंज गुणतालिकेत तीन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आता विंडिजचे केवळ तीन सामने बाकी आहेत. हे सर्व सामने जिंकले तरी विंडिजचे केवळ ९ गुणच होतील. मात्र, इतक्या कमी गुणांसह कोणताही संघ उपांत्य फेरीत जाऊ शकत नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडिजचा प्रवास संपल्याचे निश्चित झाले आहे.
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं. वर....
अधिक वाचा