By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाची रंगत दर दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येक संघ त्यांच्या परिने या विश्चचषक मालिकेत चांगलं प्रदर्शन करण्यावर भर देत आहे. याचीच प्रचिती रविवारी पार पडलेल्या बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात पाहायला मिळाली. बांग्लादेशने क्रिकेट विश्वातील बहुचर्चित दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा २१ धावांनी पराभव केला. या सामन्यात अनेक क्षण क्रिकेट रसिकांसाठी परवणीचे ठरले.
सोशल मीडियावर विश्वचषकातील याच सामन्यातील एक व्हिड़िओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आहे क्रिकेट न खेळणाऱ्या Man Of The Match चा. क्रिकेट न खेळणारा सामनावीर.....?, पडला ना तुम्हालाही प्रश्न.
बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाच्या या सामन्यात सीमारेषेपाशी असणाऱ्या एका छायाचित्रकाराने दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या फाफ ड्यू प्लेसिस याने मारलेला षटकाराचा चेंडू अशा काही सुरेखपणे पडकला, जे पाहता कॅमेरा आणि जगभरातील क्रीडारसिकांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या. षटकाराचा फटका मारत अर्धशतकी खेळी करणाऱ्या ड्यू प्लेसिसनेही त्या छायाचित्रकाराचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. इयान किंग्टन असं त्या छायाचित्रकाराचं नाव आहे. 'एएफपी' म्हणजेच 'एजन्सी फ्रान्स प्रेस'तर्फे तो या सामन्याचे काही खास क्षण टीपण्यासाठी तो तेथे उपस्थित होता. त्यावेळी एका हातात टेलिफोटो लेन्स पकडलेली असतानाच आपल्या दिशेने येणारा चेंडू त्याने पाहिला आणि अगदी सहजपणे एकाच हातात त्याने हा झेल घेतला. त्याच्या या झेलाचा रिप्ले पाहता "That is a good grab, that is a classic catch", असं म्हणत मार्क निकोलस या समालोचकांनीही त्याची दाद दिली. तर, 'आयसीसी'कडूनही याची दखल घेण्यात आली. किंग्टनच्या त्या एका झेलाने त्याला सेलिब्रिटीचाच दर्जा दिला.
विश्वचषकाच्या सामन्याच्या निमित्ताने आपल्याला मिळालेली ही काही क्षणांची प्रसिद्धी किंग्टनसाठीही तितकीच अनपेक्षित असली तरीही आनंददायी आहे. मुळात कधीकाळी मित्रमंडळीसोहबतच फार क्वचितप्रसंगी क्रिकेट खेळणाऱ्या किंग्टनचा हा झेल पाहता त्याची या खेळावर असणारी पकड दिसत असली तरीही आपण, क्रिकेटर नसल्याचं तो आवर्जून सांगतो. असं असलं तरीही यंदाच्या विश्वचषकाच्या आठवणींच्या पेटीत ही एक आठवण कायम स्वरुपी स्थान मिळवून गेली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाचा वर्ल्ड कप कोण उंचावणार? उपांत्य फेरीत कोणते चार स....
अधिक वाचा